पिंपरी – लॉकडाऊनमुळे अर्थिक संकटात सापडलेले हॉटेल, खानावळी व्यावसायिक आता पूर्वपदावर येत होते. मात्र पुन्हा गॅस आणि खाद्यतेलांसह इतर वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने हॉटेल व खानावळी चालकांना जमा-खर्चाचा मेळ बसविणे अवघड झाले आहे. परिणामी मेन्यू कार्ड बदलत दर वाढविण्यात आले आहेत. जेवण तसेच इतर खाद्यपदार्थांमध्ये 10 ते 30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका शहरात शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरीसाठी आलेल्या तरुणांना बसत आहे.
शहरात 19 किलोच्या व्यावसायिक गॅसच्या टाकीची किमत तब्बल 2389 रुपये झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला इंधन कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 104 रुपयांची वाढ केली होती. पिंपरी चिंचवड हॉटेल्स असोसिएशनने 10 टक्के दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढत्या महागाईत सध्याच्या रेटमध्ये जेवण पुरविणे शक्य होणार नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे.
रोजचे जेवण महागले
दुसरीकडे घरगुती खानावळींनी देखील टिफिनचे भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलच्या तुलनेत खानावळीच्या जेवणात मोठी भाववाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरामध्ये राहत असलेले विद्यार्थी व बॅचलर मुलांचा खर्च वाढत आहे. शहरात ठिकठिकाणी असलेल्या नाश्ता सेंटरमध्ये देखील महागाई दिसून येत आहे.
वडापाव, समोसा, इडली-वडा यासारख्या नाश्ताच्या पदार्थांची देखील किंमत वाढली आहे. खिश्यात जास्त पैसे नसल्यास पोटास आधार देणारा वडापाव 10 रुपयांवरुन थेट 15 रुपयांवर जाऊन पोहचला आहे. गॅसच्या दरामध्ये सातत्याने होणारी वाढ, तसेच खाद्यतेलांच्या वाढत असलेल्या किंमती यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी व नाश्ता सेंटरमधील मेन्यूकार्डवरील किंमती वाढल्या आहेत.