पुणे – इंधन दरवाढ आणि अन्य आर्थिक तुटीमुळे अडचणीत आलेल्या एसटी महामंडळाने ई-बस सेवा स्वीकारली आहे. “शिवाई’ नावाने ही बस धावणार आहे. दि. 1 जूनपासून पुणे-नगर मार्गावर तिचे नियोजन असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात 150 “शिवाई’ बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहेत. यात ई-मुव्हेज कंपनीसोबत 50, तर ईव्ही-ट्रान्स कंपनीसोबत 100 बसेस याप्रमाणे बसेसचा करार झाला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, पुणे-कोल्हापूर, बोरिवली-ठाणे, बोरिवली-पुणे आदी मार्गांवर या बसेस सुरू करण्यात येतील. ज्या मार्गांवर ही बस धावेल, तेथील डेपोत चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. ही 150 बसेसची ही संख्या हजारपर्यंत जाणार आहे.
वर्धापनदिनाचे औचित्य
एसटी महामंडळाच्या स्थापनेनंतर पहिली बस पुणे-नगर मार्गावर दि. 1 जून 1948 रोजी धावली होती. याचेच औचित्य साधत एसटीची पहिली ई-बस “शिवाई’ सुरू करण्याचे एसटी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.
एकदा चार्जिंगवर धावणार 300 किलोमीटर
संपूर्ण वातानुकूलित असलेली “शिवाई’ ही ई-बस एका पूर्ण चार्जिंग केल्यानंतर साधारणत: 250 ते 300 किलोमीटर धावणार आहे. त्यादृष्टीने 300 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील मार्गावर या बसेस सुरू करण्यात येणार आहे.