पुणे –कुमठेकर रस्त्यावर विश्रामबाग वाड्याजवळ बुधवारी सायंकाळी पीएमपी बसचे ब्रेक फेल झाले. यामुळे बसची धडक बसून दोन रिक्षांसह सहा वाहनांचे नुकसान झाले. या घटनेत जीवितहानी टळली. मात्र, ऐन रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.
अपघातात नुकसान झालेल्या वाहनचालकांनी मंडई पोलीस चौकीत धाव घेतली. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा प्रकार घडला, असे बसचालकाने पोलिसांना सांगितले. त्याबाबत सत्यता पडताळून पाहण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या प्रकारामुळे कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, मंडई आणि लगतच्या परसिरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. शनिपार येथील बस स्टॉपवरून अप्पा बळवंत चौकाच्या दिशेला ही बस चालली होती. नुकताच थांबा सोडल्यामुळे आणि वाहनांची गर्दी असल्याने बसचा वेग कमी होता. सेवासदन चौकातून बस पुढे जात असताना अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे एका मोटारसायकलला धडकून ही बस पुढे एका रिक्षावर आदळली.
मात्र, तरीही ब्रेक न लागल्याने ती पुढील आणखी दोन मोटारसायकल आणि एका स्कुटरला मागून धडकली. त्यापाठोपाठ रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या एका रिक्षाचालकाला धडकल्यानंतर चालकाने कशीबशी बस थांबवली. एकंदर प्रकारामुळे वाहनचालक भयभीत झाले होते. संतप्त नागरिकांनी बसच्या चालकाला आणि वाहकाला गराडा घातला.दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजल्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाले.