खटाव (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील ग्रीन झोन मध्ये असणारा दुष्काळी खटाव तालुक्यात अखेर कोरोनाने शिरकाव केला असून खरशिंगे (ता. खटाव) येथील एका वीस वर्षाच्या युवकाचा पाॅझिटिव्ह अहवाल आल्याने औंध, पळशी, पुसेसावळी परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात कोरोनाने ठाण्यातून खरशिंगे असा शिरकाव केला आहे.
बाधित रुग्ण आपल्या आईवडीलासह ठाणे येथून दुचाकीवरून गावाकडे खरशिंगे येथे प्रशासनाला चकवा देऊन आले होते. त्यानंतर त्या कुटुंबाला गावानजीकच असणाऱ्या त्यांच्या घरात होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. काल या कुटुंबातील वडीलांना थोडा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी दुचाकीवरून सातारा गाठले होते. सातारा येथील क्रांन्तीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले होते. मात्र त्रास होणाऱ्या व्यक्तिचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला. तर त्यांच्या संपर्कातील २१ वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1211839309155772/
या घटनेमुळे औंध, पळशी आणि पुसेसावळी, खरशिंगेसह परिसर हादरून गेला आहे. संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २४ जणांना प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. युवक पॉझिटिव्ह सापडल्यानंतर खरशिंगे गाव सील करण्यात आले आहे. सध्या खरशिंगे येथे प्रशासनाने प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तसेच बाधित रुग्णाचे घर, प्राथमिक शाळा, गावात निर्जंतुकीकरण फवारणी सुरू करण्यात आली आहे. प्रशासन खरशिंगे येथे तळ ठोकून आहे.