बारामती तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 17 वर
बारामती -बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवरील सिद्धेश्वर निंबोडी येथील दोघांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने इंदापूर, बारामती तालुक्याची चिंता वाढली आहे. दरम्यान, या दोघांवर रुई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यात वास्तव्यास असलेला पोलीस अधिकारी मुलगा भेटून गेल्यानंतर 15 दिवसांनी दोघांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता बारामती तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 17वर पोहोचली आहे.
सिद्धेश्वर निंबोडी येथील 13 वर्षीय मुलास व 65 वर्षीय ज्येष्ठस करोनाची लागण झाली आहे. कुटुंबातील चौघांना त्रास होऊ लागल्याने. दोन दिवसांपूर्वी त्यांची कोविड-19 चाचणी बारामती येथे करण्यात आली. त्याचे अहवाल रविवारी (दि. 31) आले. त्यामध्ये दोघांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले. दि. 13 मे रोजी पोलीस अधिकारी मुलगा आई-वडिलांना भेटण्यासाठी सिद्धेश्वर निंबोडी येथे आला होता. त्यानंतर दि. 27 मे रोजी पुणे येथे तो करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर सिद्धेश्वर निंबोडी येथील त्याच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती.
दरम्यान, सिद्धेश्वर निंबोडी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावच्या सीमा बंद करण्यात आले असून पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. दरम्यान, सिद्धेश्वर निंबोडी गावच्या लगतची बाजारपेठ म्हणून भिगवण (ता. इंदापूर) बाजपेठेची ओळख असल्याने भिगवणमध्ये बारामती तालुक्यातील नागरिकांचा संपर्क असतो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे.
पुणे-मुंबईकर ठरताहेत डोकेदुखी
भिलवाडा तसेच बारामती पॅटर्न राबवून करोनावर नियंत्रण मिळविण्यात बारामतीकर यशस्वी झाले होते. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पुण्या-मुंबईचे लोंढे बारामतीकडे वाढल्याने बारामतीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे-मुंबई येथून आलेल्या करोना संक्रमित व्यक्तीमुळे बारामतीच्या ग्रामीण भागात करोनचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पुणे मुंबईकर बारामतीकरांची डोकेदुखी ठरत आहेत.