इंदोर – भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी येथील होळकर मैदानावर होणार आहे. ज्यामध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे पुनरागमन जवळपास निश्चित आहे. पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे कोहलीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नव्हते. आता दुसऱ्या टी-२० मध्ये कोहलीच्या पुनरागमनामुळे शुभमन गिलचा पत्ता कट होऊ शकतो.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
ठिकाण : होळकर स्टेडियम, इंदोर
वेळ : सायंकाळी ७ वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्पोर्टस १८
तसेच, अफगाणिस्तान बलाढ्य संघ नसल्याने या मालिकेत विजय मिळवणे भारतासाठी मोठी गोष्टी असणार नाही. मात्र तरीही टी-२० विश्वकरंडकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची असल्याने भारत ती मोठ्या फरकाने जिंकण्यास नक्कीच उत्सुक असेल. या मालिकेत आपली प्रतिभा दाखवून येणाऱ्या विश्वकरंडकात संघात आपली जागा पक्की करण्यासाठी नवीन खेळाडू मात्र आपला कस पणाला लावताना आपणास दिसणार आहेत.
अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मध्ये शुभमन गिल काही खास करू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना गिलने १२ चेंडूत २३ धावांची खेळी केली. अशा परिस्थितीत कोहलीच्या पुनरागमनानंतर गिलला संघात जागा मिळणे कठीण आहे. मात्र, गिलच्या जागी यशस्वी जैस्वालचा सलामीवीर म्हणून संघात समावेश केला जाऊ शकतो, यासह तिलक वर्माचाही पत्ता कट होऊ शकतो. अशा प्रकारे रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली या खेळाडूंसह भारताची फलंदाजी फळी मजबूत बनली आहे. मात्र, मधल्या फळीत बदलाची आशा कमी आहे.
गोलंदाजीत बदलाची अपेक्षा
फलंदाजीनंतर गोलंदाजीतही विश्वकरंडक समोर ठेऊन बदल होऊ शकतात. स्टार फिरकीपटू रवी बिश्नोई पहिल्या टी-२० मध्ये चांगलाच महागडा ठरला. बिश्नोईने ३ षटकात ३५ धावा दिल्या होत्या आणि त्याला एकही यश मिळाले नाही. अशा परिस्थितीत बिश्नोईच्या जागी कुलदीप यादव दुसऱ्या टी-२०मध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकतो.
संभाव्य संघ :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान : इब्राहिम झदरान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलीखिल, हजरतुल्ला झाझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नवीन उल हक, रशीद खान.