इंद्रायणीत खडखडाट..!

देहूगाव – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (एमजीपी) जलउपसा केंद्राजवळील धरणातून होणारी पाणी गळती, नदी पात्रात पाणी राहिले नसल्याने आणि पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी ऐन उन्हाळ्यात (एक मेपासून) देहूगावचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. आता इंद्रायणीत जलउपसा केंद्रावर खडखडाट झाला आहे. त्यामुळे देहुकरांवर संकट उभे ठाकले आहे. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या “जोर-बैठकां’नंतर “पाणीबाणी’वर ठोस तोडगा निघण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून पाण्याविना ग्रामस्थ, भाविकांचा जीव कासावीस झाला आहे.

निकालानंतर पाण्याचा “निकाल’
देहूगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास उपअभियंता एस. डी. पाठक, शाखा अभियंता धनंजय जगधने आले होते. या चर्चेनुसार लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर 27 मे रोजी याबाबत ग्रामसभा घेऊन सविस्तर चर्चा करण्याचे आणि सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्‍वासन दिले. हे पत्र तातडीने मुख्य अभियंता भुजबळ यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. तरी सध्या त्वरीत पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत मागणी केली असली तरीही पाणी पुरवठा सुरू ठेवावा, असा कोणताही आदेश आम्हाला आलेला नसल्याची माहिती शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी दिली आहे. पाणी बिले वसुलीबाबत विचारले असता ते म्हणाले की आमचे पाणी बिल वसुली करण्याचे काम सुरू असून, पाणी बील न भरल्यास नळजोड तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे जगधने यांनी स्पष्ट केले आहे. एकदरीत देहूकरांचा पाणी प्रश्‍न सध्या जरी सुटला तरी पुन्हा पाढे पाच होणार का? पाणीसंकट कायमचा सुटणार का ? असा प्रश्‍न निर्माण होत असल्याने आणखी किती दिवस देहूकरांना पाण्यासाठी वाट पाहावी लागणार याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

देहू परिसरात ग्रामपंचायतीमध्ये सुमारे साडेपाच हजार नोंदी असलेली घरे आहेत. नळजोड मात्र दोन हजार 800 आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे होणारी थकीत पाणी बिलामुळे योजना तोट्यात सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने ही पाणी योजना हस्तांतरीत करून घ्यावी. म्हणून एमजीपीने 30 नोहेंबर 2017 ते 12 एप्रिल 2019 दरम्यान 19 वेळा पत्र देत 1 मे रोजी पाणी पुरवठा बंद केला. अर्धवट असलेली योजना पूर्ण केल्याशिवाय हस्तांतरीत करून घेणार नसल्याचा ठेका धरत ग्रामपंचायतीने कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने देहूकरांच्या घशाला कोरड पडली आहे.

गावात दोन दिवसांपासून पाणी बंद झाल्याने ग्रामस्थांच्या आरडाओरड सुरू झाल्यानंतर शुक्रवारी (दि. 3) हवेली पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे यांनी विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्हैसकर यांच्यीशी चर्चा करून पाणी पुरवठा सुरू करावे, लवकरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यांच्यासमवेत चर्चा करून या समस्येवर तोडगा काढू असे सांगितले. उन्हाळा असल्याने गावात तातडीने पाणी पुरवठा सुरू करावा या संदर्भात आयुक्‍तांना निवेदन दिले. या वेळी सरपंच ज्योती टिळेकर, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला करंडे, हेमा मोरे, सदस्य दिनेश बोडके, माजी सरपंच कांतीलाल काळोखे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसकर आणि आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पाणी बिलापोटी नळ ग्राहकांकडे सुमारे साडेचार कोटी रुपये थकलेले आहेत. सद्य स्थितीत येथील पाणी पुरवठा सुरू ठेवणे शक्‍य नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला चालविणे शक्‍य नसल्याचे 12 एप्रिल 2019 रोजी लेखी पत्राद्वारे 1 मे पासून पाणी पुरवठा बंद करीत असल्याचे कळविले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.