विविधा: अरुण दाते

माधव विद्वांस

भावगीत जर भावपूर्ण आवाजात गायले तर नक्‍कीच भावते. अशी उत्कट भावगीते गाणारे कै. अरुण दाते यांची आज जयंती. दोनच दिवसांनी 6 मे रोजी त्यांचे पुण्यस्मरणही आहे. या श्रेष्ठ गायकाचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे 4 मे 1935 रोजी झाला.इंदूर हे जसे खवय्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे तसेच कलागुणांना प्रोत्साहन देणारे सांस्कृतिकनगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. इंदूरच्या होळकर संस्थानिकांनी कलेला कायमच उत्तेजन दिले. अशा ठिकाणीच अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते यांचे नाव संगीत क्षेत्रात आदराने घेतले जायचे.त्यांच्या गाण्यांच्या मैफिलीना प्रतिष्ठित रसिकांची उपस्थिती असायची. त्यामुळे बालवयातच त्यांच्यावर गीतसंगीताचे संस्कार झाले होते.

सुरुवातीला अरुण दाते इंदूरजवळच्या धार येथे कुमार गंधर्वांकडे गाणे शिकले. त्यानंतर गायनाचे पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. दिवसभर गाणे कानावर पडत असल्याने आपला मुलगा गायक व्हावा असे रामूभैय्यांनाही वाटत असे. मात्र, त्याने चांगले शिकावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांची दोन्ही स्वप्ने अरुण दाते यांनी पूर्ण केली. अरुण दाते टेक्‍सटाइल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी मुंबईला गेले. तेथे त्यांची पु. ल. देशपांडे यांच्याशी गाठ पडली. ते वरचेवर भेटत असत. त्यांच्यातील गायक पुलंनी ओळखला होता. अरुण दाते हे उत्तम गात असल्याचे पाहून पुलंनी रामूभैय्या दातेंना त्यांच्या मुलाबद्दल कौतुक केले.

दरम्यान, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत अरुण दाते नापास झाल्याचे त्यांच्या वडिलांना समजल्यावर ते म्हणाले, टेक्‍सटाइल इंजिनिअर होणारे अनेक जण आहेत, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते ते सांग. घरूनच असे प्रोत्साहन असल्याने, अरुण दाते यशस्वी टेक्‍सटाइल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायकही झाले. त्यानंतर 1955 पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. मंगेश पाडगावकर यांनी रचलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेले “शुक्रतारा मंदवारा’ हे गाणे त्यांच्या जीवनातील मैलाचा दगड ठरला. या गाण्याने दाते गायकांच्या नामावलीत जाऊन बसले. त्यानंतर 1962 मध्ये त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. मराठीबरोबर हिंदी व उर्दुमधेही ते गात असत. लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत त्यांनी अनेक गीते गायली. त्यात प्रामुख्याने भावगीतांचाच समावेश होता. गायनाबरोबरच टेक्‍सटाइल इंजिनिअर म्हणून नोकरी चालूच होती. वर्ष 89-90च्या सुमारास बिर्ला टेक्‍सटाइलच्या विभागाचे उपाध्यक्ष असताना 28 वर्षांचा नोकरीचा कालखंड झाल्यावर नोकरी सोडली. मग मात्र, त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले.

त्यांचे “शतदा प्रेम करावे’ हे आत्मचरित्र आहे. मंगेश पाडगावकरांनी रचलेल्या, यशवंत देव यांनी संगीत दिलेल्या व अरुण दाते यांचा आवाज असलेल्या “भातुकलीच्या खेळामधली’ हे गाणे अत्यंत हृदयस्पर्शी ठरले. “शतदा प्रेम करावे’ या मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा आशय त्यांनी त्यांच्या गायनातून लोकांचे मनावर बिंबविला. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांना “राम कदम कलागौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी, भेट तुझी माझी स्मरते, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला ही गाणी अजरामर ठरली आहेत. या महान गायकास अभिवादन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.