इस्लामाबाद – दरवर्षी एक जानेवारीला भारत आणि पाकिस्तान या देशांनी आपापल्या देशात असलेल्या अणु प्रकल्पांविषयी तसेच एकमेकांच्या देशातील केैद्यांविषयी एकमेकांना माहिती देण्याचा करार आहे. त्यानुसार आज दोन्ही देशांनी ही माहिती एकमेकांना सादर केली. 1 जानेवारी 1992 पासून या माहितीचे आदान-प्रदान करण्याची प्रथा सुरू आहे.
सुरूवातीला फक्त अणु प्रकल्पांविषयीच माहिती सादर केली जात असे पण आता यात एकमेकांच्या देशांतील कैद्यांचीही माहिती देण्याची प्रथा सुरू झाली आहे. पाकिस्तानने आज सकाळी साडे दहा वाजत पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयात जाऊन ही माहिती सादर केली.
तर भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अकरा वाजता पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात जाऊन ही माहिती सादर केली. यानुसार सध्या पाकिस्तानातील कारागृहात एकूण 628 भारतीय कैदी असून त्यातील 577 मच्छिमार आहेत. तसेच भारतातील कारागृहात एकूण 355 पाकिस्तानी कैदी असून त्यातील 282 नागरीक आणि 73 मच्छिमार आहेत.