इस्लामाबाद – ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानमध्ये करोनाची पाचवी लाट जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी वर्तवली आहे. पाकिस्तानमध्ये शुक्रवारी ओमायक्रॉनचे 14 नवीन रुग्ण सापडले आहेत. इस्लामाबादेत आतापर्यंत ओमायक्रॉनचे 66 रुग्ण सापडले आहेत.
गुरुवारी कराचीमधील एकाच कुटुंबातील 11 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कराचीतील लघु आणि सूक्ष्म क्षेत्रांवर दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन लावण्याचे निर्देश कराचीच्या पूर्व भागातील डेप्युटी कमिशनरांनी दिले आहेत. या भागातील नागरिकांच्या मुक्त हालचालींवर निर्बंध लावण्यात येत आहेत. औषधे आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांव्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच एका वाहनावर दोघांनी प्रवास करण्यासही परवानगी नाकारण्यात आली आहे.
शुक्रवारी पाकिस्तानात देशभरात 515 करोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत आणि 6 जणांचा मृत्यू झाला आहे, असे “नॅशनल कमांड इॅन्ड ऑपरेशनल सेंटर’ने म्हटले आहे.