दुबई – आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या रोहित शर्माने 800 गुणांची नोंद केली आहे. अशी झेप घेणारा रोहित भारताचा पहिलाच फलंदाज आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित पाचव्या क्रमांकावर असला तरीही त्याच्या कसोटी क्रिकेटच्या कारकीर्दीत प्रथमच 800 गुणांचा टप्पा पार केला आहे.
रोहितचे सध्या 813 गुण झाले आहेत.इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटीत भारताने 157 धावांनी विजय मिळवला. या कसोटीत दुसऱ्या डावात रोहितने 127 धावांची खेळी केली होती. त्याचा फायदा त्याला क्रमवारीत झाला. या शतकामुळे त्याला 40 गुण मिळाले.
भारताचा कर्णधार विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचे 783 गुण झाले आहेत. कोहलीच्या क्रमवारीतही प्रगती झाली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट अव्वल स्थानी असून त्याचे 903 गुण आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लेबुशेन चौथ्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा रवीचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर कायम असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 771 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. अष्टपैलुंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा तिसऱ्या तर, अश्विन पाचव्या स्थानावर आहे.