संघर्ष : अशांत अफगाणभूमी

हेमंत महाजन

जगात पहिल्यांदाच दोनहून अधिक जागतिक दहशतवादी एखाद्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे या दहशतवाद्यांवर निर्बंध घातलेले देश तालिबानला मान्यता कशी देणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

काळजीवाहू मंत्रिमंडळाची घोषणा
तालिबानने काळजीवाहू मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. यात प्रामुख्याने अमेरिका आणि अफगाण सरकारविरुद्धच्या 20 वर्षांच्या संघर्षाचे नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना सर्वोच्च पदे देण्यात आली आहेत. जागतिक दहशतवादी असलेल्या मुल्ला हसन अखुंद याची इस्लामिक अमिरात अफगाणिस्तानचा पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. तर, अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांसाठी असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सिराज हक्‍कानी गृहमंत्री असणार आहे. अमेरिकने त्याच्यावर 36 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हक्‍कानी नेटवर्क दहशतवादी गट असून आत्मघाती हल्ल्यांमध्ये या गटाचा समावेश होता. तालिबान सरकारच्या प्रमुख पदांवर दहशतवादी, दहशतवादाचे आरोप असणाऱ्यांची वर्णी लागली आहे.

हक्‍कानी नेटवर्कला झुकते माप

सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आहे. तालिबान आणि हक्‍कानी नेटवर्कच्या नेत्यांमध्ये गोळीबार झाला. संघर्षादरम्यान हक्‍कानी गटाकडून झालेल्या गोळीबारात मुल्ला बरादर जखमी झाला आहे. तालिबान सरकार स्थापन करण्यासाठी असलेले मतभेद दूर करण्यासाठी पाकिस्तान आयएसआय प्रमुखांनी अफगाणिस्तानचा दौरा केला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना “आयएसआय’च्या मदतीमुळेच तालिबान अफगाणिस्तानात अल्पावधीत परतू शकली, असे पाश्‍चात्य माध्यमांनी म्हटले आहे.

स्थापना सोहळ्यासाठी पाकिस्तान, कतार, तुर्की, चीन, रशिया, इराणला आमंत्रण

तालिबानने सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी पाकिस्तान, कतार, तुर्की, चीन, रशिया, इराण या देशांना आमंत्रण दिले आहे, यामागचे कारण नेमके काय? पाकिस्तान आणि चीन हे तालिबानला कशी मदत करते हे जगजाहीर आहे. तालिबानला वाटते की आर्थिक मदत मिळण्याकरिता चीन आणि रशिया यांची मोठी मदत होऊ शकते. जर रशिया तालिबानच्या बाजूंनी आला तर तो नॉर्दन अलायन्सला मदत करणार नाही आणि त्यांचा लवकर पराभव होईल. तुर्कस्तानकडून लष्करी मदतीची अपेक्षा आहे इराणकडून सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेल आणि इंधन सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते.

पंजशीरच्या संघर्षात पाकिस्तानकडून तालिबान्यांना मदत पुरवण्यात आली. लढाईचे पूर्ण नियोजन पाकिस्तानी सैन्याने केले, ज्यामध्ये सैन्याचा कमांड कंट्रोल, लढाईचे प्लॅनिंग, चीनच्या मदतीने इंटेलिजन्स गोळा करणे, दारूगोळ्याची मदत, पाकिस्तानमधून आणलेले काही कडवे दहशतवादी आणि सर्वात महत्त्वाचे आहे की तालिबानचे नेतृत्व पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फॉर्सेसचे अधिकारी आणि जवानांनी केले. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने तालिबानला पंजशीरवर हल्ल्यासाठी समन्वय केला.

तालिबानविरोधातील संघर्ष सुरूच राहील- नॉर्दन अलायन्स

पंजशीर प्रांतावर निर्णायक ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. दुसरीकडे, तालिबानविरोधातील संघर्ष सुरूच राहील, असे नॉर्दन अलायन्सने (उत्तर आघाडी) म्हटले आहे. अमरुल्ला सालेह, अहमद मसूद ताजिकिस्तानमध्ये असल्याचे वृत्त आहे. रेझिस्टन्स फोर्सचे प्रवक्‍ते आणि अहमद मसूद यांचे निकटवर्तीय समजले जाणारे फहीम दश्‍ती हे ठार झाले आहे.

या मोहिमेचे नेतृत्व नॉर्दन अलायन्सचे प्रवक्‍ते फहीम दश्‍ती यांनी केले होते, जे नंतर मारले गेले. अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केल्यानंतर देशातील 34 प्रांतांपैकी पंजशीर प्रांताने तालिबान्यांना आव्हान दिले होते. पंजशीरमधील नॉर्दन अलायन्सने प्रतिहल्ला करत तालिबान्यांचे मोठे नुकसान केले होते. तालिबान्यांचा पंजशीर विरुद्धचा संघर्ष खूप जुना आहे.

पाकिस्तानी सैन्याने लढाईमध्ये हेलिकॉप्टर, फायटर ए क्राफ्ट, स्मार्ट शस्त्रांचा वापर करून मदत केली. जिथे जिथे गुप्तहेर माहिती मिळाली होती तिथे तिथे नॉर्दन अलायन्सच्या सैन्याचा पराभव झाला. अमरुल्लाह सालेह यांच्या घरावरती हल्ला करण्यात आला आणि अनेक नेत्यांना मारण्यात आले. चीनकडे असलेले सॅटेलाइट टेक्‍नॉलॉजीचा वापर करून मसूदचे सैन्य कुठे आहे, याची नेमकी माहिती दिली. 

ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आर्मेनिया आणि अझरबैजानच्या लढाईमध्ये तुर्कस्तानच्या ड्रोन्सचा विजयामध्ये मोठा वाटा होता. तशाच प्रकारे तुर्कस्तान ड्रोन्सचासुद्धा वापर इथे करण्यात आला.

आता अमरुल्लाह सालेह कोणती भूमिका घेणार? ते तालिबानसमोर पुन्हा आव्हान उभे करू शकतील का? असे प्रश्‍न उभे राहात आहे. लष्करी नेता अहमद मसूद आणि राजकीय नेता अमरुल्लाह सालेह हे ताजिकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत. 

त्यांच्यामध्ये हा लढा पुढे चालवण्याची क्षमता आहे, परंतु त्याकरता त्यांना सेंट्रल रिपब्लिकच्या देशांचा सपोर्ट मिळणे गरजेचे आहे. याशिवाय एक महाशक्‍ती म्हणजे अमेरिका किंवा रशिया यांच्याकडून मदत अपेक्षित आहे. मात्र, ही मदत सध्या मिळताना दिसत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.