नवी दिल्ली – बिम्सटेक या ७ देशांच्या गटाच्या सरचिटणीसपदी भारताचे इंद्र मणि पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिम्सटेकच्या महत्वाच्या पदावर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय आहेत.
पांडे हे १९९० च्या तुकडीचे भारतीय विदेश सेवेचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे कायम प्रतिनिधी आणि जिनिव्हा येथील अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांवर भारताचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.
बिम्सटेक अर्थात बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टरल टेक्निकल ॲन्ड इकॉनॉमिक कोऑपरेशन या गटामध्ये बंगालच्या उपसागर परिसरामधील भारताव्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान या देशांचा समावेश होतो.
पांडे यांनी बिम्सटेकचे सरचिटणीसपद स्वीकारण्यापूर्वी ढाका येथील मुख्यालयात सचिव म्हणून काम केले होते. भूतानचे तेन्झिन लेकफेल यांच्याकडून त्यांनी सरचिटणीस पदाची सूत्रे स्वीकारली. बिम्सटेकचे सरचिटणीस म्हणून त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.