नवी दिल्ली – येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात राम लल्लाच्या अभिषेकपूर्वीच खलिस्तान्यांचा दहशतवादी कारवायांसाठी कटकारस्थाने सुरू झाली आहेत.
मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याने पुन्हा भारताविरोधात विष ओकले आहे. दहशतवादी पन्नूनने मुस्लिमांना अयोध्येत होणाऱ्या या सोहळ्याला विरोध करण्यास सांगितले आहे. यासाठी एक व्हिडिओही जारी करण्यात आला आहे.
पन्नूनने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मुस्लिमांनी भारतात उर्दूस्थान निर्माण करण्याची वेळ आली आहे. २२ जानेवारीला मोदींचे मुस्लिमांविरुद्ध ऑपरेशन ब्लूस्टार आहे.
ऑपरेशन ब्लूस्टार १९८४ मध्ये अमृतसरमध्ये झाले होते. यामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवताना भारतीय लष्कराने खलिस्तानी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले याचा खात्मा केला होता.
भारताचा शत्रू खलिस्तानी दहशतवादी पन्नून याने राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अमृतसर ते अयोध्येपर्यंतचे विमानतळ बंद केले जातील, असे बेताल वक्तव्य केले आहे. पन्नूनवर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत.
२०२० मध्ये पन्नूनला युएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले होते. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टने यापूर्वी मिरवणूक काढण्याची योजना आखली होती परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ती रद्द करण्यात आली होती.