हैदराबाद – तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून २६ जानेवारीनंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभारही त्यांच्यावरच आहे.
त्यांनी आदिलाबाद, निजामाबाद, मेडक, महबूबनगर आणि हैदराबाद या जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांची येथे स्वतंत्रपणे भेट घेतली आणि आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन केले.
पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून त्यांची पहिली जाहीर सभा आदिलाबाद जिल्ह्यातील इंद्रावेल्ली येथे होणार आहे. २०२१ मध्ये तेलंगणा प्रदेश अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रेड्डी यांनी इंद्रावेली येथेच त्यांची पहिली जाहीर सभा घेतली होती. आता ते मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर इंद्रावेलीतील पहिल्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री आठवड्यातून तीन दिवस दररोज दुपारी ४ ते ६ या वेळेत आमदारांना सचिवालयात उपलब्ध असतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणात काँग्रेसने तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी किमान १२ जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण १७ जागा आहेत.