हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र सेल – आयुक्‍त

दहा कोटींची तरतूद : शहर फेरीवाला समितीची बैठक
पिंपरी –
शहरातील फेरीवाला घटकाना कायद्यानुसार लाभ देण्यासाठी महानगरपालिकेत हॉकर्स प्रोग्राम मॅनेजमेंट युनिट सुरु करुन पथारी, हातगाडी, टपरी धारकाचे सर्व विषय हाताळण्यात यावेत, असे सांगत स्वतंत्र सेल स्थापण्याचे आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकरांनी दिले. आयुक्‍त हे शहर फेरीवाला समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी समितीच्या बैठकीत आदेश दिले असल्याची माहिती महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे.

मनपा आयुक्त कक्षात झालेल्या बैठकीस सहायक आयुक्‍त मंगेश चितळे, अतिक्रमण विभाग प्रमुख राजन पाटील, सहायक आयुक्‍तस्मिता झगडे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, विजय शहापुरकर, मनिषा राऊत, डॉ सरोज अम्बिके, राजेंद्र वाघचौरे, प्रवीण कांबळे, कविता खराडे , दामोदर मांजरे, क्षेत्रीय अधिकारी आशा दुर्गुडे, मनोज लोणकर, आण्णा बोदड़े, विजय खोराटे, संदीप खोत, श्रीनिवास दांगट आदी उपस्थित होते.

उल्लेखनीय बाब अशी की गेल्या काही दिवसांपासून शहरात होत असलेल्या कारवाईमुळे फेरीवाले आणि प्रशासनामध्ये कित्येक विवाद निर्माण झाले आहेत. यावेळी नखाते म्हणाले की, आयुक्‍तांनी हॉकर्स झोन बाबत दिलेल्या आदेशाचे क्षेत्रीय कर्यालयाकडून व संबंधित विभागांकडून पालन होत नाही. फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण केले जात नाही आणि फेरीवाल्यांना दोषी ठरवले जात आहे. फेरीवाले अपात्रचे पात्र करणे व नूतनीकरण करण्यासाठी चकरा मारत आहेत. सुरुवातीला 5 जागी हॉकर्स झोन मॉडलसाठी तातडीने सुरू करावेत.

यावर आयुक्‍तांनी सांगितले की, फेरीवाला विषय जलद मार्गी लागण्यासाठी सुमारे दहा कोटींची तरतूद केली असून त्यानुसार सर्वेक्षण, हॉकर्स झोन, प्रशिक्षण, आदी बाबी हॉकर्स प्रोग्राम मॅनेजमेंट युनिट मधून केले जाणार आहे. सदस्यानी मांडलेल्या विषयावर आयुक्‍तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने पत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.