स्मार्टकार्डसाठी जामखेड बसस्थानकात गर्दी

अन्नपाण्याविना लागत आहेत ज्येष्ठांच्या रांगा; खंडित वीजपुरवठ्याचाही फटका
आगाराचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

जामखेड – राज्य परिवहन मंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीसाठी स्मार्ट कार्ड वाटप सुरू आहे. यासाठी एसटी आगारात दररोज सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत आहे. अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असून आगरमार्फत पर्यायी व्यवस्था केली नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना तासनतास वीज येईपर्यंत वाट पाहत बसावे लागते. यामुळे पुन्हा एकदा जामखेड आगारचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दरम्यान, गत आठवडाभरापासून सदर स्मार्ट कार्ड खरेदीसाठी जामखेड बस स्थानकावर ज्येष्ठ नागरिक, स्त्री, पुरुषांची मोठी गर्दी होत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रिद घेऊन सुविधा पुरविण्यासाठी परिवहन मंडळांकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. अगोदर परिवहन मंडळाकडून प्रवाशांना प्रवासादरम्यान सवलतीच्या पासेस या कागदी स्वरूपात दिल्या जात होत्या. कमी वयाच्या अनेकांनी प्रवासी भाड्यात सवलतीसाठी आपले ज्येष्ठ नागरीक असल्याचे ओळखपत्र बनवून घेतले होते. यामुळे महामंडळाला दररोज बसणारा लाखो रुपयांचा फटका पाहता, खऱ्या ज्येष्ठांना लाभ मिळावा आणि योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर नियंत्रणासाठी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. जामखेड आगारात या कार्डचे वितरण सुरू आहे.

ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड घेण्यासाठी दररोज मोठी गर्दी करीत असले, तरी एसटी प्रशासनाने बस स्थानक आवारात ज्येष्ठांना रांगेने स्मार्ट कार्ड घेण्याची व्यवस्था केली असल्याने ही सर्व वडीलधारी मंडळी उन्हाची पर्वा न करता, अन्नपाण्याची वाट न पाहता दिवसभर उन्हात थांबून स्मार्ट कार्डसाठी गर्दी करीत आहेत. एसटी प्रशासनाने त्यांच्यासाठी किमान सावली आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. बसस्थानक कार्यालयात एक संगणक आणि तद्‌नुषंगिक यंत्रणा उभारली आहे. मात्र सतत वीज खंडित होत असल्याने स्मार्टकार्ड देण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.

आगार व्यवस्थापकाने लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांना तासन्‌तास लाईट येईपर्यंत वाट पाहत बसावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. जामखेड बसस्थानक येथे दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत या ठिकाणी ज्येष्ठांची गर्दी होत आहे. हे स्मार्ट कार्ड आधारला जोडले जाणार आहे. बोगस ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्यांना चाप बसेल. स्मार्टकार्डसाठी 50 रुपये शुल्क आकारणी केली जाते. यासाठी दलालाची मध्यस्थी न करता स्वत: लाभार्थ्यांनी स्वत: हजर राहून कार्ड घ्यावे, नोंदणी येथील बसस्थानकातील पासेस केंद्रावर सुरू आहे. अर्ज भरताना ज्येष्ठ नागरीकांच्या अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर घेतला जाणार आहे. तसेच आधार कार्डाशी संलग्न माहिती प्राप्त झाल्यावर नाव नोंदणी होईल. नाव नोंदणी झाल्यावर 15 दिवसानंतर नोंदणी केलेल्या ठिकाणी स्मार्ट कार्ड प्राप्त होईल, अशी माहिती देण्यात आली.

शासनाने सुरू केलेल्या स्मार्टकार्ड घेण्यासाठी आम्ही सकाळी जामखेड बस स्थानकात आलो, मात्र बस स्थानकात पाण्याची सोय केली नव्हती. लाइट गेल्याने दोन तास आम्हाला वाट पाहावी लागली. आगार व्यवस्थापकांनी लाइट गेल्यास येथे पर्यायी व्यवस्था करून ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड थांबवावी.

अमृत डुचे , ज्येष्ठ नागरिक, खूरदैठण

Leave A Reply

Your email address will not be published.