दापोडीकरांची पाण्यासाठी वणवण

दिवसाआडही पाणी मिळेना : महिला नोकरदारांची तारेवरची कसरत
गुलाबनगर, जय भीमनगरमधील पाणी समस्या बनली तीव्र
पावसाळ्यातही दाही दिशा पाण्यासाठी फिरण्याची वेळ

पिंपळे गुरव –  दापोडीतील गुलाबनगर, जय भीमनगर भागात अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या भागाला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. महिला नोकरदार वर्गाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी हे पाणी अत्यंत कमी दाबाने येत असल्याने ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आल्याचा संताप येथील महिला व्यक्त करीत आहेत.

महापालिका शहरात सध्या चोवीस तास पाणी पुरवठ्याचे नियोजन करीत आहे. त्यासाठी पुढील दोन वर्षे जाणार आहेत. परंतु, सध्या शहरातील काही भागाला पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः दापोडीकरांना वारंवार विस्कळीत पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. दापोडीचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर महापालिकेने आपल्याकडे उपलब्ध जलवाहिनी टाकून दापोडीची पाणी पुरवठा वितरण व्यवस्था उभी केली.

पूर्वी वापरात असलेल्या, उपलब्ध होतील त्या जलवाहिन्या जोडून पाणी पुरवठा सुरू झाला. परंतु, त्यानंतरच्या कालावधीत नवीन जलवाहिनी टाकून पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यातच पाणी चोरी करणाऱ्यांनी अनेक ठिकाणी जलवाहिनी फोडून नळजोड घेतले आहेत.

जुनाट गळती लागलेल्या जलवाहिन्या, पाणी चोरी आणि त्यातच सध्या दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने दापोडीतील विशेषतः गुलाब नगर, जय भीमनगर मध्ये रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. महिला वर्गाची घरातील कामे खोळंबली जातात. नोकरदार महिलांना पाण्याविना कसे काम करावे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. शाळा सुरू झाल्याने महिलांच्या अडचणीत भर पडली आहे.

महापालिकेने संपूर्ण शहरभरात पाणी कपात सुरू केली आहे. त्यामुळे दापोडीकरांनाही दिवसाआड पाणी मिळते. परंतु, हे पाणी अत्यंत कमी दाबाने मिळते. काही भागात पाणी येतच नाही. महापालिकेकडे तक्रारी करुनही त्यावर अद्याप तोडगा न निघाल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडून मागणीनुसार टॅंकर पुरविले जातात. परंतु, टॅंकरवर पाण्यासाठी झुंबड उडते. काहींना रिकामे हंडे घेऊन घरी परतावे लागते. पाणी समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी दापोडीकरांकडून होत आहे.

 

दापोडीतील पाणी समस्या हा कायम चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत सभागृहात आम्ही अनेकदा आवाज उठवला, आंदोलने केली. परंतु, पाणी पुरवठा विभाग गांभीर्याने घ्यायला तयार नाही. दापोडी भागाला असमान पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येते तर काही भागाला पाणीच मिळत नाही. महापालिकेने समान पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे अन्यथा जनआंदोलन छेडावे लागेल.

– रोहित काटे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

गुलाबनगर, जयभीमनगर या भागाला गेली अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दिवसाआड पाणी पुरवठ्यानंतर पाणी पुरवठ्याची समस्या तीव्र झाली आहे. महापालिकेकडून केवळ आश्‍वासने दिली जातात. पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत प्रत्यक्षात पाऊल उचलले जात नसल्याने पाणी टंचाईची समस्या दापोडीकरांची पाठ सोडायला तयार नाही.

– रवी कांबळे, स्थानिक रहिवासी.

या भागात नळाला थेट मोटारी जोडल्या जात आहेत. काही मोटारी आम्ही जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे काही भागाला पाणी पुरवठा होतच नाही. नागरिकांनी थेट नळाला मोटारी जोडू नयेत. येथे अनधिकृत नळजोडही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचाही परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो. नागरिकांनी नळजोड अधिकृत करुन घ्यावेत. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

– सदाशिव पाटील, उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग, महापालिका.

Leave A Reply

Your email address will not be published.