कुडाळ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची राज्य उत्पादन विभागाकडून प्रत्यक्ष चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली येथील त्यांच्या बंगल्याचे व्हॅल्युएशन केले जात आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून संयुक्तरीत्या केली जात आहे. या कारवाईने वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांचे घर आहे. त्या ठिकाणी नव्याने बंगला बांधण्यात आलेला आहे. या बंगल्याचे बांधकाम किती स्क्वेअर फिटमध्ये आहे आणि त्याचे व्हॅल्युएशन ठरवण्यासाठी मोजमाप घेतली जात आहेत.
सार्वजनिक बांधकामच्या उप अभियंता श्रीमती प्रभू, अभियंता प्रमोद कांबळी यांच्यासह राज्य उत्पादन विभागाचे एक पथक हे मोजमाप करत आहे. नाईक यांच्या बंगल्याची मोजमापे घेतल्यानंतर बांधकामासाठी प्रत्यक्ष किती कोटींचा खर्च झाला आणि किती खर्च दाखवला आहे, याचे ऑडिट केले जाणार आहे.