पिंपरी, दि. 7 – एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या रहाटणी येथील एसएनबीपी स्कूलमध्ये बुधवारी उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबल्याने पिंपरी-िंचंचवडकर मंत्रमुग्ध होणार आहेत. शहरवासीयांना वाह उस्ताद वाह म्हणण्याची संधी एसएनबीपी देत आहे. स्कूलच्या “स्कूल ओपन एअर थिएटर’ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबला नवाज पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव देण्यात आले असून त्याचे उद्घाटन उस्ताद झाकीर हुसैन स्वतः करणार आहेत. हा कार्यक्रम येत्या बुधवारी (दि. 11 जानेवारी) होणार आहे. त्यानंतर एक खास सांगितीक कार्यक्रम होणार आहे.
या विषयी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे बुधवारी (दि. 11 जानेवारी) दुपारी 4 वाजता एसएनबीपी स्कूल, रहाटणी येथे आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांच्या नावाला समर्पित असलेल्या “स्कूल ओपन एअर थिएटर’चे ते स्वत: उद्घाटन करणार आहेत. उस्ताद झाकीर हुसैन हे संगीताला मूर्त रूप देतात आणि अनंतकाळपर्यंत प्रेरणा देत राहतील, अशी खात्री असल्याने त्यांचे नाव या ओपन एअर थिएटरला देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ओपन एअर थिएटर 3000 चौरस फूट क्षेत्रफळाचे आहे. त्याचा उपयोग परफॉर्मिंग आर्टस, ललित कला, साहित्य, क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रात प्रावीण्य वाढवण्यासाठी केला जाईल. या कार्यक्रमासाठी येरवडा, मोरवाडी, रहाटणी, चिखली, वाघोली, बावधन येथील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. एसएनबीपी ही ऍक्टिव्हिटी बेस्ड स्कूल असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीवर विश्वास ठेवते. असंख्य क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात माहिती देणारे विविध उपक्रम समाविष्ट करून ते घडवून आणले जातात.
उद्घाटनानंतर उस्ताद झाकीर हुसैन शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि काही मनोरंजक किस्से सांगतील. तसेच संध्याकाळी 5.30 पासून ते त्यांचा एक खास सांगितीक कार्यक्रम होणार आहे.