व्हिकटोरिया, (सेशेल्स) – सेशेल्समध्ये महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. या प्रकाराचा भारतीय दूतावासाने तीव्र निषेध केला आहे. राजधानी व्हिक्टोरियामधील पीस पार्कमधील या पुतळ्यांची तोडफोड करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही पुतळ्यांचे गेल्या वर्षी जून महिन्यात अनावरण करण्यात आले होते, असे भारतीय दूतावासाच्या माध्यमातून सांगण्यात आले.
पीस पार्कमध्ये महात्मा गांधींचा आणि नेल्सन मंडेला यांचा पुतळा सेशेल्सचे संस्थापक अध्यक्ष सर जेम्स मॅकम यांच्या पुतळ्याच्या शेजारीच उभा करण्यात आला होता. महात्मा गांधींचा वसाहतवादाच्या विरोधातील आणि मानवतावादाचा संदेश जगमान्य आहे. महात्मा गांधींनी अहिंसेच्या लढ्याला जगभर प्रेरणा दिली होती. भारत आणि सेशेल्सदरम्यानच्या ऐतिहासिक संबंधांचे प्रतिक म्हणून हा पुतळा होता, असेही भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
या पुतळ्यांची तोडफोड झाल्यानंतर दखल घेण्यात आल्याबद्दल भारताने समाधान व्यक्त केले आहे. या कृतीतील दोषी व्यक्तींना शोधून काढून त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली आहे.
Kerala : 24 तासांत 5 अवयवांचे प्रत्यारोपण; विशेष म्हणजे पाचही शस्त्रक्रिया…
यापूर्वी जगभरात अन्यत्र महात्मा गांधींच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात न्यूयॉर्कमध्ये 6 समाजकंटकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची मोडतोड केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये युनियन स्वेअरमधील महात्मा गांधींच्या पुर्णाकृती पुतळ्याचीही अशीच मोडतोड झाली होती.