मॉस्को – रशियामध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला लागल्याने आता नागरिकांचे फेरलसीकरण केले जाणार आहे. गेल्या 24 तासांत 23,543 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूवी एक दिवसातील रुग्णांची संख्या 21,042 इतकी होती. रुग्णसंख्या वाढल्याने रशियातील करोना रुग्णांची संख्या 55,38,142 इतकी झाली आहे.
एकट्या मॉस्को शहरामधील दैनंदिन रुग्णांची संख्या 5 हजारांवरून वाढून 7 हजारांवर पोहोचली आहे. मॉस्को शहराव्यतिरिक्तचा जिल्ह्याचा परिसर, सेंट पीटर्सबर्ग आणि रशियातील अन्य 85 भागांमधील रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढते आहे. रशियामध्ये आतापर्यंत मरण पावलेल्या करोना रुग्णांची संख्या 1,35,886 इतकी झाली आहे.
नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी आता कोविड-19 विरोधी बूस्टर डोस देण्याची तयारी मॉस्कोच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे, असे मॉस्कोचे महापौर सर्जी सोब्यानीन यांनी सांगितले.
अति संसर्गजन्य डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येणार आहे. रशियामध्ये मंजुरी मिळालेल्या चार लसींचेच डोस या फेरलसीकरणादरम्यान दिले जाणार आहेत. मात्र, स्पुटनिक-व्ही आणि स्पुटनिक लाईट या लसी प्राधान्याने देण्यात येणार आहेत.