सिडनी – चीनमध्ये अंतर्गत लोकशाही किती आहे व लोकशाही समर्थकांची कशी गळचेपी केली जाते याच्या अनेक बातम्या अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि आपल्या विस्तारवादी भूमिकेमुळे हा देश असाही अनेक ठिकाणी एकाकी पडत चालल्याचे निदर्शनास येते.
ज्या देशांना त्याने कर्जाच्या बोजाखाली दाबले आहे, ते देश त्याच्याशी जुळवून घेताना दिसतात. मात्र, इतर देशांचे तसे नाही. जगात सगळीकडे शत्रूच निर्माण करणारा चीन आपल्या स्वत:च्या नागरिकांचे दमन करण्यातही किती पुढे गेला आहे याचीही एक ताजी बातमी आता प्रसिद्ध झाली आहे.
त्या देशात लोकशाही नाही, हे तर खरेच. तेथे गळचेपी केली जाते आणि प्रसारमाध्यमांनाही मुक्तपणाने आपले विचार मांडता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र, जे शिक्षण अथवा अन्य कारणासाठी जगातील अन्य देशांत गेले आहे त्यांनाही चीन धाकात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मानवाधिकारांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेने चीनच्या मुजोरीचा हा किस्सा आपल्या एका अहवालात मांडला आहे. त्यानुसार चिनी असलेले मात्र आता ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भयाच्या सावटाखाली जगत असल्याचे सांगण्यात आले आहे.
काही विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या समर्थनासाठी एक कार्यक्रम घेतला होता. त्यात सहभागी झालेल्या चिनी विद्यार्थ्यांच्या चीनमधील नातलगांना आणि त्यांच्या मातापित्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यांची प्रचंड मानसिक छळवणूक केली जाते आहे.
पोलीस त्यांना एकतर भेटीसाठी पाचारण करतात किंवा त्यांच्या घरी जाऊन धडकतात. या प्रकारांमुळे त्यांचे कुटुंबीय तर भयात वावरत आहेतच मात्र कुटुंबापासून हजारो किमी लांबच्या देशातही हे विद्यार्थी एकाकी जगत असताना त्यांना त्या देशातील कायदे आणि तेथील लोकांपेक्षा आपल्या चीन या देशाचीच भीती अधिक बसली आहे.
या मुलांवर पाळत ठेवणे, त्यांना धमकावणे, त्यांना अन्य विद्यार्थ्यांच्या मार्फत धाकात ठेवणे असले प्रकार सुरू असून ऑस्ट्रेलियातील विद्यापीठेही यात आपल्या विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यात कमी पडत असल्याचे अहवालात म्हटले आहे.