मुंबई – राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्या ईडी कोठडीत 5 दिवसांची वाढ केली आहे.
दोघांनाही 6 जुलैपर्यंत ईडी कोठडीत राहावे लागणार आहे. पाच दिवसांपूर्वी सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरून कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला अटक करण्यात आली.
या दोन्ही आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी ईडीने पुन्हा एकदा मोठे खुलासे केले. सुरुवातीला ईडीने न्यायालयाकडे दोघांचीही सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, आता आरोपींच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे मिडीलमॅन असल्याचे ईडीने म्हटले आहे. तसेच 4 कोटी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जाणार होते. हे पैसे कॅशमध्ये येत होते, असा दावाही ईडीने केला आहे. आरोपी चौकशीला सहकार्य करत नसून सचिन वाझेला ओळखत नसल्याचे आरोपी म्हणतात. आम्ही काही इलेक्ट्रॉनिक पुरावे त्यांच्यासमोर ठेवले. तरी आरोपी सचिन वाझेला ओळखत नाही सांगतात, असेही ईडीने म्हटले आहे.
दरम्यान, आयपीएस अधिकाऱ्या बदल्या करण्यात येत होत्या. ती लिस्ट तपासायची आहे. बदली झालेल्या आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी करायची असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले.