मुंबई – निरंजन हिरनंदानी यांच्या नेतृत्वाखालील हिरनंदानी समूहाच्या मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईतील 25 आस्थापनांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. मागील काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणा बांधकाम व्यावसायिकांची चौकशी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
पॅन्डोरा पेपर्समध्ये नोंद असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचा ट्रस्ट, परदेशी मालमत्ता आणि करचुकवेगिरी या प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे कर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निरंजन यांचे बंधू सुरेंद्र मालमत्तांवरही छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पॅन्डोरा पेपर्समधील नोंदीनुसार निरंजन आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ब्रिटिश व्हर्जिनिया आयर्लंडस्थित ट्रस्टला 6 कोटी डॉलर्सचा लाभ मिळाला आहे. “सॉलिटेअर ट्रस्ट हा दर्शन हिरनंदानी यांचा व्यक्तिगत गुंतवणुकीचे साधन आहे.
त्याचा हिरनंदानी समूहाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असे या समूहाने या आधी स्पष्ट केले आहे. मात्र, निरंजन यांच्या दुबईस्थित मुलाने ब्रिटिश व्हर्जिनिया आयर्लंडवर स्थापन केलेल्या तीन कंपन्यांमध्ये निरंजन हे राखीव संचालक आहेत. तेथील कायद्यानुसार एकमेव संचालकांचा वारसदार म्हणून राखीव संचालकाची तरतूद करता येते.
ट्रायडंट ट्रस्ट कंपनीच्या नोंदीनुसार ब्रिटिश व्हर्जिनिया आयर्लंडमध्ये 39 वर्षीय दर्शन हिरनंदानी यांनी 2006 ते 8 या काळात किमान 25 कंपनींची स्थापना केली आहे. चेन्नईमधील नवी टाऊनशीप व बंगळुरूमधील डेटा सेंटर उभारणीत करचोरी केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला असून, त्यासाठी हे छापे टाकले जात असल्याचे समजते.