नवीदिल्ली – रामनगरीचा नयाघाट चौक आता लता मंगेशकर चौक म्हणून ओळखला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या चौकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिवंगत लता मंगेशकर यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेश देऊन अयोध्येतील जनतेचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज लता मंगेशकर चौकाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वीणा निर्माता राम सुतार यांचीही भेट घेतली. यानंतर ते रामकथा पार्ककडे रवाना झाले. उद्घाटन सोहळ्याला लता मंगेशकर यांचे पुतणे आणि सूनही उपस्थित होते.
लतादीदींच्या आवाजात आस्था, आध्यात्मिकता आणि पवित्रता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. त्यांनी गायलेल्या भजनात दैवी गोडवा होता. त्यांचा आवाज देशाच्या प्रत्येक काना कोपऱ्याला युगानुयुगे जोडून ठेवेल. असा आशावाद पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ संदेशाद्वारे व्यक्त केला.तसेच राम मंदिर अयोध्येत होत आहे यासाठी देखील त्यांनी सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या.
आज अयोध्येला जुने वैभव प्राप्त होत आहे. रामनगरी सजवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आज आम्ही लता चौकाचे उद्घाटन केले. तसेच शहरातील प्रत्येक चौक भव्य करण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्री योगिनी यावेळी सांगितले.