नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नामीबीया देशातून ८ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे. या चित्त्याचे संरक्षण करण्यासाठी आता श्वान पथक तैनात करण्यात येणार आहे. यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात ‘जर्मन शेफर्डस’ जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘जर्मन शेफर्डस’ कुत्र्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण केंद्र हरियाणातील पंचकुला येथे आहे. या श्वान पथकाच्या माध्यमातून नुकतेच नामीबीया देशातून भारतात आणलेल्या चित्त्यांना संरक्षण पुरवले जाणार आहे. हे श्वान पथक शिकाऱ्यांपासून चित्त्यांना असलेला धोका ओळखतील आणि नवीन वातावरणात आलेल्या चित्त्यांचे रक्षण करतील. त्याचबरोबर वाघाची कातडी, हाडे, हत्तीचे दात, रेड सँडर्स आणि इतर बेकायदेशीर वन्यजीव उत्पादने शोधण्याचे प्रशिक्षणही या कुत्र्यांना दिले जाणार आहे. या कुत्र्यांना ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर इंडिया’ आणि ‘इंडो-तिबेट बॉर्डर’ पोलीस फोर्सद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.
या श्वान पथकाला पुढील सात महिने प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ‘स्निफर डॉग’ म्हणून आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात केल्यानंतर या श्वान पथकाला मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये तैनात केलं जाणार आहे. हे स्निफर डॉग पुढील वर्षी एप्रिलपर्यंत चित्त्यांसह इतर प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे प्रशिक्षित होणार आहेत.