यवतमाळ: यवतमाळमध्येही करोनाचा विळखा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. आजच्या दिवसात आणखी सात जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 51 वर पोहोचली आहे.
यवतमाळमध्ये काल 20 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. काल दुपारपर्यंत 16, तर संध्याकाळी आणखी 4 रुग्ण सापडले. या 20 रुग्णांपैकी 19 रुग्ण आधीपासून विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली होते. कालच्या दिवसात सापडलेले 20 रुग्ण पवार पुरा इंदिरा नगर भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत.
रविवारी सकाळी 7 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे गेल्या 24 तासांत सापडलेल्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 27 झाली. एकूण 27 जणांमध्ये 14 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश आहे.
यवतमाळमध्ये सापडलेल्या एकूण करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 51 झाला आहे. त्यापैकी दहा जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 41 इतकी आहे.