लोणावळा – लोणावळा बाजारपेठत होणारी गर्दी कमी करण्यासाठी शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यान शासनाने परवानगी दिलेली दुकाने खुली ठेवण्याची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 ही निश्चित करण्यात आली आहे. तर दुग्धालये सकाळी नियोजित वेळेत व सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सुरू राहतील, असा आदेश मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी पारित केला आहे. शनिवार व रविवारी शासनाच्या आदेशानुसार कडक लॉकडाऊन राहणार आहे.
शासनाने संचारबंदीचे आदेश लागू केलेले असताना देखील नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाजारात गर्दी करत असल्याचे भयावह चित्र पहायला मिळत आहे.
शहरातील वाढती रुग्णसंख्या अटोक्यात आणण्यासाठी व बाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून शुक्रवारी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, उपनगराध्यक्ष संजय घोणे, नगरसेवक राजू बच्चे, विशाल पाडाळे, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा यांच्या उपस्थितीत लोणावळा नगरपरिषदेमध्ये सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी बाजाराची वेळ कमी करण्याच्या नगरपरिषदेच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी केलेल्या विनंतीनुसार शुक्रवारी प्रांतअधिकारी संदेश शिर्के यांनी वरील आदेश पारित केले आहे.