“जर महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवली तर परवाना रद्द करू”; केंद्राकडून कंपन्यांना धमकावल्याचा नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः सर्वाना नको नको करून सोडले आहे. रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत, ऑक्सिजनची कमतरता आणि त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा या सर्व संकटाचा राज्याला सामना करावा लागत आहे. राज्यात अशी बिकट परिस्थिती असताना मंत्री नवाब मलिकांनी खळबळजनक दावा करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

अशा धोकादायक परिस्थितीत रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडे कोणता पर्याय राहणार नाही. आपल्या देशात १६ निर्यातदारांकडून २० लाख इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. आता केंद्र सरकारकडून निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे ही औषधं देशात विकायला परवानगी मागितली असताना केंद्र सरकारने अद्याप त्यास नकार दिला आहे असे नवाब मलिकांनी सांगितले.

दरम्यान, उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडूनच ते विकले जावे असं सरकारचं म्हणणं आहे. या ७ उत्पादन करणाऱ्या कंपन्या जबाबदारी घेण्यात नकार देत आहेत. संकटकाळी निर्णय घेणं अपेक्षित असते. औषधांची आवश्यकता असताना आणि उपलब्धता आहे फक्त निर्णय घेण्याची गरज आहे. या समस्येचे निराकरण करून राज्यातील सर्व हॉस्पिटलला औषधांचा पुरवठा केला पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.