जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान मिळवणेअजिंक्य रहाणेसाठी खूप कठीण आहे, असे मत माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्राने व्यक्त केले आहे.
बॉक्सिंग डे च्या दिवशी 26 डिसेंबरला सेंच्युरियन सुपरस्पोर्ट पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरु होणार आहे. बीसीसीआयने संघाच्या उपकर्णधारपदी लोकेश राहुलच्या नावाची घोषणा केली, त्यानंतर आकाश चोप्राने हे मत व्यक्त केले आहे.
रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी उपकर्णधारपदासाठी लोकेश राहुलच्या नावाची घोषणा करण्यात आली. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित या कसोटी मालिकेत खेळणार नाही. त्याच्याजागी भारताच्या अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळची संघात निवड करण्यात आली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला रहाणेच्या जागी उपकर्णधार म्हणून रोहितची नियुक्ती करण्यात आली. रोहित आता भारताच्या टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले. पण आता त्याचा उपकर्णधारपदासाठीही विचार करण्यात आलेला नाही.
एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदी सुद्धा लोकेश राहुलची निवड होऊ शकते. रहाणेला संघात स्थान मिळवणे कठिण जाईल. काही दिवसांपूर्वी तो कसोटी संघाचा कर्णधार होता. पण आता तो उपकर्णधारही नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत रहाणेने नेतृत्व केले.