पहिल्या निवडणुकीत चहूबाजूंनी पाचपुतेंवर नशीब मेहेरबान..!

अर्शद आ.शेख
श्रीगोंदा – 1980 ला बबनराव पाचपुते यांनी पहिली विधानसभा लढविली. अन्य उमेदवार नसल्याने पाचपुतेंच्या गळ्यात उमेदवारी पडली. या निवडणुकीत त्यांना नशिबाने चहूकडे साथ दिली.अन्‌ अशक्‍यप्राय वाटणारा विजय त्यांनी शिवाजीराव नागवडे यांच्यावर मिळवला. देशात तेव्हा इंदिरा लाट होती अन्‌ श्रीगोंद्यात जनता पक्षाने विजय मिळवला.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचे पुलोद सरकार बरखास्त केले. विधानसभा भंग झाली. मध्यावधी निवडणूक लागली, ती मे 1980 ला. नागवडे हेच कॉंग्रेसचे उमेदवार होते. तत्पूर्वी कुंडलिकराव जगताप यांना जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी बदलण्यात आली. जनता पक्षाकडे सक्षम उमेदवार नव्हता. 15 वर्षे सलग सभापती असलेले बापूसाहेब जामदार यांनी जनता पक्षाची उमेदवारी करावी म्हणून स्वतः पाचपुते अन्‌ प्रा.तुकाराम दरेकर व काही तरुण त्यांच्याकडे गेले.संपतराव जामदार यांच्याशी सल्ला मसलत झाल्यावर बापूसाहेब जामदार यांनी निवडणुकीस नकार दिला.

जनता पक्षाने ज्ञानेश्वर राऊत (काष्टी) कांतीलाल भंडारी (श्रीगोंदा) व भानुदास सावंत (देवदैठण) या नावावर विचार केला. पहिले दोन नाव अल्पसंख्याक असल्याने मागे पडले. सावंत यांना विरोध झाला. मग नाईलाज म्हणून डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या शिफारशीनुसार पाचपुते यांना उमेदवारी मिळाली. त्यासाठी कॉलेजच्या मित्रांनी जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पन्नालाल सुराणा यांना तारा (टेलिग्राम) पाठवून पाचपुतेंना उमेदवारी देण्याची शिफारस केली होती. पाचपुते तेव्हा पंचायत समिती काष्टी गणाचे सदस्य होते.

मे महिना असल्याने रखरखीत उन्हात निवडणूक प्रचार सुरू झाला.दोन मोटारसायकलवर प्रचार केला जात. डोक्‍याला बांधलेले उपरणे गावात गेल्यावर सोडून त्यात लोकवर्गणी केली जात. एका गावात पंचवीस- तीस रुपये गोळा होत. तीन रुपये लिटर पेट्रोल होते. वर्गणीचे पैसे पेट्रोलसाठी वापरत.नागवडे (कॉंग्रेस), पाचपुते (जनता पक्ष पुरस्कृत), कुंडलीकराव जगताप (कॉंग्रेस अर्स, शरद पवारांचा पक्ष) अशी निवडणूक झाली. बाबासाहेब सरोदे हे जनता पक्ष गटाचे उमेदवार होते. त्यांचे चिन्ह होते महिला.

अडाणी मतदारांची फसगत झाली. इंदिरा गांधी यांचे चिन्ह म्हणजे महिला असा समज झाला. 2800 मतदारांनी महिला व पंजा या दोन्हीकडे शिक्के मारले, ती मते बाद झाली. तर सरोदे यांना सोळाशे मते मिळाली. सुमारे तीन हजार बाद मतांमुळे नागवडे अवघ्या 1519 मतांनी पराभूत झाले. सरोदे यांची उमेदवारी पाचपुते यांना तारक ठरली. नागवडे यांना 26473 मते मिळाली. पाचपुतेंना 27992 व जगताप यांना 11052 मते मिळाली.

या निवडणुकीत कॉलेजचा मुद्दा टर्निंग पॉईंट ठरला. तालुक्‍यात एकही कॉलेज नव्हते. नागवडे यांना ते ढोकराई येथे हवे होते, तर श्रीगोंद्यातील लोकांना ते श्रीगोंदा शहरात हवे होते. बापूंनी निवडणूक होईपर्यंत तरी कॉलेज श्रीगोंद्यात होईल हे म्हणावे, असा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. नागवडेंना खोटे आश्वासन द्यायचे नव्हते.

पाचपुते यांनी कॉलेज हे श्रोगोंद्यातच होईल हे तर ठणकावलेच, शिवाय कॉलेज होत नाही तोवर लग्न करणार नसल्याची प्रतिज्ञा केली. या मुद्यावर श्रीगोंदेकरांनी पाचपुते यांना भरभरून मते दिली. पुढे पाचपुते यांनी आधी कॉलेजचे आश्वासन पूर्ण केले नंतर लग्न.

पवारांची पहिली सभा जगताप यांच्यासाठी 28 मे 1980 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा तालुक्‍यात आले. जगताप हे त्यांचे उमेदवार होते. त्यांनी पिंपळगाव पिसा येथे सभा घेतली. नंतर नगरकडे जाताना अवकाळी पावसामुळे ओढ्या- नाल्यांना पूर आल्याने मागे फिरावे लागले. विसापूरच्या रेस्ट हाऊसवर ते मुक्कामी थांबले. गावातील लोकांनी आणलेल्या भाजी-भाकरी हातात घेऊन उभ्यानेच खाल्ली. या आठवणी स्वतः जगताप यांनी अनेकदा जागविल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.