भारताकडून मलेशियाच्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध ?

मलेशियाने केलेल्या काश्‍मीरविषयीच्या वक्‍तव्यामुळे भारताची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : भारत मलेशियाकडून होणाऱ्या पामतेल आणि अन्य उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. सरकार आणि उद्योग जगतातील सूत्रांच्या हवाल्याने एका इंग्रजी वर्तमानपत्राने ही माहिती दिली आहे. काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर मलेशियाने टीका केली होती. त्यामुळे भारत सरकार मलेशियाकडून होणाऱ्या वस्तुंच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.

मलेशियाकडून पामतेल आणि अन्य उत्पादनांची आयात कमी करण्याचा भारत सरकारचा विचार आहे. त्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सहभागी झालेल्या सरकारी आणि उद्योग जगतातील सूत्रांनी ही माहिती दिली. भारताने आक्रमण करुन जम्मू-काश्‍मीर ताब्यात घेतले आहे. भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करुन तोडगा काढावा असे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान माहाथीर मोहम्मद यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये केले होते. त्यावरील प्रतिक्रिया म्हणून ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मलेशियन पंतप्रधानांच्या या विधानावर मोदी सरकार नाराज आहे. 5 ऑगस्टला भारत सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करुन जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केले होते. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गदारोळ केला. पण टर्की, मलेशिया आणि चीन वगळता पाकिस्तानला कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही.

संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया प्रमुख इस्लामिक देशांनीही पाकिस्तानची साथ दिली नाही. संयुक्त राष्ट्रासह सर्वांनीच पाकिस्तानला भारतासोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आवाहन केले. पण पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाची भाषा सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.