Lok Sabha Election 2024 – राज्यात सुमारे २ वर्षांपासून अनेक राजकीय उलथापालथी घडल्या. त्यामुळे राज्यातील राजकारणाचे चित्रच बदलून गेले. त्यातून लोकसभा निवडणुकीत सबकुछ उल्टा-पुल्टा झाल्याचे दिसून येत आहे.
राजकीय पक्षांमधील फूट, आघाड्यांची फेरजुळणी, पक्षबदल आदींमुळे एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी आता मित्र, तर आधीचे मित्र एकमेकांचे नवे प्रतिस्पर्धी बनले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच नांदेडमध्ये सभा झाली. त्या सभेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. चव्हाण अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये होते. त्यांनी अलिकडेच त्या पक्षाचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यामुळे चव्हाण आणि त्यांचे आधीचे प्रतिस्पर्धी प्रताप पाटील चिखलीकर हे शहा यांच्या सभेत एकाच व्यासपीठावर दिसले. तसे विसंगत राजकीय चित्र आज राज्याच्या कानाकोपऱ्यात, पक्षा-पक्षांत आणि कुटूंबांमध्येही दिसत आहे.
शिवसेनेत फूट पडण्याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळीक होती. मात्र, राजकारणाचा नूर पालटल्याने आता ते कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत. पवार आणि मुंडे ही राज्यातील प्रभावी राजकीय कुटूंबे.
त्यांच्यातील संबंधांनीही वेगळे वळण घेतले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन स्वतंत्र गट एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत. पवार काका-पुतणे राजकीय प्रतिस्पर्धी बनले आहेत.