इस्लामाबाद – आशिया खंडामध्ये पाकिस्तान सर्वात महाग देश ठरला आहे. तेथील महागाईचा दर २५ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. तर आर्थिक प्रगतीचा वेग चौथ्या सर्वात कमी पातळीवर म्हणजे १.९ टक्क्यांइतका राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आशिया विकास बँकेच्या अहवालामध्ये पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीची ही अवस्ता नमूद करण्यात आली आहे. गुरुवारी फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
एशियन डेव्हलपमेंट आउटलुकने पुढील आर्थिक वर्षासाठी देखील एक निराशाजनक चित्र रेखाटले आहे, पुढील आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानातील महागाईचा दर १५ टक्के असेल. आशिया खंडातील ४६ देशांमध्ये हा सर्वाधिक असेल.
तर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आर्थिक प्रगतीचा दर २.८ टक्के इतका पाचव्या क्रमांकावरचा असण्याचा अंदाज देखील या अहवालामध्ये वर्तवण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये पाकिस्तानातील महागाईचा दर संपूर्ण आशिया खंडामध्ये सर्वाधिक म्हणजे २५ टक्क्यापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ पाकिस्तान हा देश आशिया खंडातील सर्वात महाग देश ठरला आहे.
यापूर्वी पाकिस्तानातील रहाणीमानाचा खर्च संपूर्ण दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक होता. आता संपूर्ण आशिया खंडात पाक महाग ठरतो आहे. देशातील महागाईचा दर २१ टक्क्यांपर्यंत नियंत्रित करण्याचे उद्दिष्ट स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आणि सरकारने ठेवले आहे.
परंतु २२ टक्के व्याजदर केल्यामुळे मोठे नुकसान करूनही ते हे उद्दिष्ट गाठू शकणार नाहीत. चालू आर्थिक वर्षात, देशाचा आर्थिक विकास दर म्यानमार, अझरबैजान आणि नौरू नंतर चौथ्या क्रमांकाचा सर्वात कमी म्हणजे १.९ टक्के राहील.
पाकिस्तान दीर्घ काळासाठी मंदीच्या टप्प्यात आहे आणि जागतिक बँकेनेही गेल्या आठवड्यात म्हटले आहे की कोणत्याही प्रतिकूल धक्क्यामुळे आणखी १० दशलक्ष लोक गरिबीच्या जाळ्यात येऊ शकतात. पाकिस्तानमध्ये सुमारे ९८ दशलक्ष लोक आधीच गरीबीत जीवन जगत आहेत.
आशियाई विकास बॅकेने यापूर्वी पाकिस्तानातील स्थिती आशादायक होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र कठोर जागतिक आर्थिक परिस्थिती, नवीन बाह्य वित्तपुरवठ्याची आवश्यकता आणि जुन्या कर्जाच्या परतफेडीच्या आव्हानांना पाकिस्तान तोंड देतच राहील, असे चित्र ताज्या अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे.