सांगली – सांगलीत शहर आणि जत तालुक्यातील अंकले येथे दोघांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या 40 इतकी झाली असून यापैकी 27 जणांनी करोनावर मात केली आहे. मुंबईतून सांगलीतील रेव्हिन्यू कॉलनीत आलेल्या व्यक्तीच्या स्त्रावाचे नमुने बुधवारी दि. 6 मे रोजी घेण्यात आले होते. तर अंकले येथे आलेल्या व्यक्तीच्या स्त्रावाचे नमुने गुरुवारी दि. 7 घेण्यात आले होते. शुक्रवारी या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
या दोघांना मिरज करोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईतून सांगलीतील रेव्हिन्यू कॉलनीत आलेल्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे सांगलीत शिरकाव केल्याचे आढळून आले आहे. दरम्यान त्याला घरात घेण्यात न आल्याने त्याने त्याच परिसरातील मित्राच्या घरात त्याने आश्रय घेतला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तो राहत असलेल्या मित्रालाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत, याची तपासणी सुरू असून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.
जत तालुक्यातील अंकले येथे मुंबई येथून चार जण आले होते. त्यांनी मुंबईतून टॅक्सीतून प्रवास सुरू केला. नंतर त्यांनी वाशी ते फलटण असा ट्रकमधून प्रवास केला. फलटण ते कवठेमहांकाळ तालुक्यातील नागजपर्यंत मालवाहतूक ट्रकमधून प्रवास केला आणि नागजपासून जत तालुक्यातील अंकलेपर्यंत त्यांनी पायी प्रवास केला आहे. मुंबईतून अंकलेत हे सर्व आल्याचे समजताच त्यांचे तातडीने क्वारंटाइन करण्यात आले. यामधील बाधिताला लक्षणे दिसू लागताच त्याला मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अंकले गाव पूर्णपणे सील करण्यात आले आहे.