‘इमर्जन्सी’त दवाखान्यात जाताना नागरिकांची तारांबळ
चौका-चौकात थांबलेले पोलीस माहिती देण्यास असमर्थ
पुणे – सद्यपरिस्थितीत “इमर्जन्सी’ असेल, तर बॅरिकेटिंग न केलेला आणि दवाखन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गही पोलीस दाखवू शकत नाहीत. कारण त्यांना स्वत:ला आपल्या हद्दीत कोठे आणि किती रस्ते बंद केले याची माहितीच नसते, ही वस्तुस्थिती समोर आली आहे.
वाहतूक शाखेने त्यांनी बंद केलेले रस्ते आणि बॅरिकेटिंगची माहिती बंदोबस्तावरील पोलिसांना नकाशांसह उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, वाहतूक शाखेने असे कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळेच रस्त्यावर असलेल्या पोलिसांना आपल्या ठिकाणापासून इतर ठिकाणापर्यंत वाहनास जाण्यास कोणता रस्ता खुला आहे, याची माहितीच नसते.
यामुळे प्रसंगी एखादा सर्वसामान्य नागरिक वाहन घेऊन रुग्णालय अथवा इतर ठिकाणी जात असेल, तर तो बॅरिकेट्सच्या सापळ्यात अडकून पडतो. बंदोबस्तावरील पोलीसही त्याला योग्य तो रस्ता दाखवण्याला असमर्थ ठरतात आणि ती व्यक्ती एकाच भागात गोल-गोल फिरताना वैतागून जाते. वेळेत रुग्णालयात पोहोचता आले नाही, तर अघटित घटना घडण्याचा देखील संभव निर्माण होऊ शकतो. त्यातून रात्रीची वेळ असेल तर विचारण्याची सोयच नाही. यामुळे वाहतूक शाखेने पुढाकार घेऊन चौकांमध्ये आणि ठिकठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना रस्त्यातील अडथळ्यांबद्दल आणि खुल्या ठेवलेल्या रस्त्याबद्दल माहिती द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
…अन् माणूसकीही जागेवर खिळते
नुकतीच एक घटना उपनगरात घडली. एका मुलाला वडिलांना दवाखन्यात न्यायचे होते. रिक्षा न मिळाल्याने मुलाने वडिलांना मोटारसायकलवर बसवले. परंतु अत्यवस्थ वडिलांना गाडीवर बसणे शक्य झाले नाही. त्यांना कॅथेटर लावले होते. ते खाली पडले. अशावेळी माणूसकीही जागेवर खिळून राहते, असेच म्हणावे लागेल.