ग्रामीण भागात विषाणूजन्य आजार वाढले

– विशाल धुमाळ

दौंड शहरासह ग्रामीण भागामध्ये विषाणूजन्य आजार (व्हायरल इन्फेक्‍शन) आणि डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मात्र, यावेळी अचानकपणे कधी पाऊस, कधी गरम होणे, तर कधी थंडावा असे तिन्ही प्रकारचे ऋतू अचानक जाणवत आहेत. याचाच परिणाम विषाणूजन्य आजारांवर होत असून, या वातावरणात हे आजार लवकर पसरत आहेत.

सध्या दौंड शहरासह तालुक्‍यात पाऊस हा थोडासा झाला असला तरी या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असून, डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ होत आहे, यावर त्वरीत उपाययोजना करण्याची नागरिक मागणी करीत आहेत. दौंड नगरपालिकेने खबरदारीचे उपाय म्हणून शहरात फवारणी सुरू केली आहे, त्यामुळे विषाणूजन्य आजार कमी होण्यासाठी त्याचा फायदा होईल. मात्र, डेंगूच्या डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.

शहरात जंतुनाशक फवारणी सुरू असली तरी तालुक्‍यातील ग्रामीण भागातील चित्र याच्याविरुद्ध आहे. ग्रामीण भागात विषाणूजन्य आजार वाढत असताना ग्रामपंचायतींकडून कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पंचायत समितीने लेखी आदेश काढूनच प्रत्येक ग्रामपंचायतींना जंतूनाशक फवारणी करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. पंचायत समितीने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींना डेंग्यूची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याबाबतही आदेश दिल्यास त्या प्रकारे ही डेंग्यूची उत्पत्तीस्थाने नष्ट होतील. ग्रामपंचायतींनी फवारणी करून डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली, तर तालुक्‍यात सुरू असणारा विषाणूजन्य आणि डेंग्यूचे आजार कमी होतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.