पिंपरी -स्वाइन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बुधवारी (दि. 23) स्वाइन फ्लूच्या आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या तीनवर गेली आहे.
करोना बाधितांच्या संख्येत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. एकीकडे करोनाचे संकट असतानाच दुसरीकडे स्वाईन फ्लूनेही डोके वर काढले आहेत. आत्तापर्यंत शहरात 23 स्वाईन फ्लू रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 17 मार्चनंतर करोनामुळेही तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
यामुळे महापालिकेने स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी, गरोदर महिला आणि मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन आकुर्डी रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय (पिंपरी) येथील अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णांची स्वाइन फ्लू तपासणी केली जात असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे.