रुग्णसंख्या अद्याप कमी झालेली नाही
पुणे- चिकनगुनिया, डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या अद्याप कमी झाली नसून, या दोन महिन्यांत या दोन्ही रोगाच्या संशयितांची संख्याही कमी झालेले नाहीत.
करोनाबरोबरच चिकनगुनिया, डेंग्यू आणि स्वाइन फ्लू बाधितांची संख्या मध्यंतरी वाढली होती. ती अद्याप कमी झालेली नाही. गेल्या दोन महिन्यांत म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी (दि. 17 पर्यंत)मध्ये डेंग्यूचे 261 संशयित आढळले होते. त्यातील 58 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर, चिकनगुनियाचे 38 जण आढळले आहेत.
जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीच्या 15 दिवसांतच संशयित आणि बाधितांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. या दोन रोगांशिवाय स्वाइन फ्लूची रुग्णसंख्याही अद्याप कमी झालेली नसून, डिसेंबर 2021 पर्यंत 289 स्वाइन फ्लूचे बाधित सापडले आहेत. तर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 2 हजार 334 जण संशयित आढळले असून, त्यातील 985 जणांचे स्वॅब टेस्टींग करण्यात आले आहेत.
एडिस इजिप्ती जातीच्या डासापासून डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रसार होतो तर एच1एन1 विषाणूची लागण झाल्यानंतर स्वाइन फ्लूची लागण होते. त्यामुळे घरात, घराशेजारी, सोसायट्यांमध्ये, कुंड्यांमध्ये, फेकून दिलेले टायर या सगळ्यांमध्ये पाणी साठून राहिल्यामुळे त्यात डासांची पैदास होऊ शकते. त्यामुळे अशा ठिकाणांची पाहणी करून गेल्या दीड महिन्यांत 187 जणांना नोटीस बजावली आहे.