दिलीप मोहितेंचा जामीन अर्ज मंजूर

राजगुरूनगर – जुलै 2018 मध्ये झालेल्या, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारप्रकरणात संशयित आरोपी करण्यात आलेले, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा मुंबई येथील उच्च न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. या बातमीनंतर राजगुरूनगर येथील त्यांच्या कार्यालयापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी, चाकण येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी, दिलीप मोहिते-पाटील यांना संशयित आरोपी करण्यात आल्यानंतर, त्यांनी खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती ढेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. मोहिते यांच्या बाजूने त्यांचे वकील ऍड. मनोज मोहिते व तपन थत्ते यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आणि पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी ठेवल्याची माहिती मोहिते यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान त्यांना 1 ऑगस्ट रोजी चाकण पोलीस ठाण्यात जबाब देण्यास सांगण्यात आले आहे.

माजी आमदार मोहिते यांचा मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामीन मंजूर झाल्याची वार्ता समजताच तालुक्‍यात मोहिते समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. राजगुरूनगर येथील मोहिते यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, माजी जि. प. सदस्य अरुण चांभारे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, खेड पंचायत समितीचे सदस्या नंदा सुकाळे, वैशाली दौंडकर, मंदा शिंदे, तालुका उपाध्यक्ष उल्हास दौंडकर, ग्राहक सेलचे अध्यक्ष सुनील थिगळे, दिनेश कड, मनीषा सांडभोर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.