दौंडच्या शेतकऱ्यांचे कष्ट मातीत; दुबार पेरणीचे संकट

– निलेश जांबले

वासुंदे – दौंड तालुक्‍यातील जिरायती भागात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. 2017चा हंगाम कोरडा गेला, 2018ला काही तरी शेतकऱ्यांच्या हाती पडेल या आशेने शेतकऱ्यांनी बॅंकासह पतसंस्था, सावकार यांच्याकडून पैसे घेऊन तर काहींनी सोने नाणे मोडून शेतीची कामे केली; पण, तेव्हाही पेरणीच झाली नाही, तर या वर्षी शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. सलग पाचवा हंगाम वाया गेल्याने येथील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होण्याची गरज आहे.

दौंड तालुक्‍यातील जिरायत भागातील वासुंदे, हिगणीगाडा, रोटी, खोर, देउळगावराजे, कुसेगाव, पडवी, पांढरेवाडी, कुरकुंभ, जिरेगाव, लाळगेवाडी या भागात खरीप पूर्णपणे वाया गेला आहे. जिरायत भागात अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही, यामुळे पावसाळ्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

सध्या वातावरण पावसाचे आहे. देऊळगावराजे आदी परिसरात आज (दि. 26) थोडा पाऊस झाला असला तरी या संपूर्ण परिसरात मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे. अन्यथा हा हंगामही वाया गेला, तर शेतकऱ्यांची स्थिती चिंताजनक होणार आहे.

“जानाई’तून पाणी द्यावे
दौंड तालुक्‍यातील फळबाग शेतकरी दुष्काळ अनुदानापासून वंचित आहे. तालुक्‍यातील बागायतीला मुळशी धरणातील पाणी मिळण्यासाठी प्रयत्न होतो. खोर, देउळगाव गाडा येथे पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यास प्रशासनाने हिरवा कंदील दिला; पण, लाळगेवाडी, जिरेगाव, वासुंदे, कुरकुंभ, कोठडी, हिगंणीगाडा, रोटी या गावांना शाश्‍वत पाणी मिळू शकत नाही, हे वास्तव आहे. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने जानाई उपसा सिंचन योजनेतून कमीत कमी पिण्यासाठी व जनावरांना चारा पाणी या साठी तरी प्रयत्न करण्याची गरज आहे.

पाटस मंडळात खरीप हंगामातील क्षेत्र 1894 हेक्‍टर असून, 25 ते 30 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल. दुष्काळात टॅंकरच्या सहाय्याने जगवलेल्या बागांनाही भरपाई मिळण्याची गरज आहे, तसा प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठवला आहे.
– पी. एम. चिपाडे मंडळ कृषी अधिकारी, पाटस.


पाऊस अजूनही लाबंला तर सूर्यफूल पेरणीची शिफारस केली आहे. पाऊस झाल्यास 15 ऑगस्टपर्यंत शेतकरी पेरणी करू शकतो. मागील दुष्काळ मदतीसंदर्भात 33 टक्‍क्‍यांपेक्षा कमी नुकसान असल्यास मदत देता येणार नाही.
– बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी, पुणे.


तालुक्‍यातील दोनच गावांना लाभ झाला आहे, तर बाजरी प्रकल्पाबाबत गावातील फक्त 25 शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला असून, त्यांना दीड किलो बियाणे बीजप्रक्रियेसाठी आणि 250 मिली अझोक्‍टोबॅक्‍टर, 250 मिली पीएसबी मिळाले आहे.
– प्रकल्प लाभार्थी, पाटस.


पाऊस कमी असल्याने दुबार पेरणीचे संकट आहे. जिरायत भागातील फळबागाही अडचणीत आहेत. चारा पिकासाठी कडवळ मकाच्या पेरणी झाल्या आहेत, पाऊस झाला तरच ही पिके येतील.
– जयश्री कदम, तालुका कृषी अधिकारी, दौंड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.