पुणे – शहरासाठी दोन दिवसच पुरेल इतका लससाठा असून राज्य सरकारकडे लसींची मागणी महापालिकेने केली आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत लस तुटवड्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
गुरूवारपर्यंत महापालिकेकडे सुमारे 33 हजारांचा लस साठा होता. त्यातील रोजचा 12 हजार साठा धरल्यास आणखी सुमारे 20 ते 22 हजारच लस महापालिकेकडे शिल्लक आहेत. ही लस दोनच दिवस पुरणार आहे.
महापालिकेने राज्याकडे सुमारे तीन लाख लसींची मागणी केली होती. त्यातील 55 हजारच लस महापालिकेला मिळाली आहे. आणखी सुमारे अडीच लाख लस मिळण्याच्या प्रतिक्षेत महापालिका आहे. येत्या एक एप्रिल पासून तर सरसकट 45 वयापुढील नागरिकांना लस देण्याला सुरूवात केली जाणार आहे.
45 वर्षे वयापुढील नागरिकांची शहरातील संख्या साडेदहा लाख आहे. त्यामुळे पुरेशी लस आणि ती देण्यासाठी जास्तीतजास्त सेंटर्स उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राज्याबरोबरच महापालिकेनेही कंबर कसली आहे.
राज्याकडे जशा लसी उपलब्ध होत आहेत, तसे त्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे केंद्राकडून लस मिळाल्यानंतर ती सर्व महापालिकांसह, अन्य जिल्ह्यांमध्ये नेहमीप्रमाणे वितरित केली जाणार आहे.
– डॉ. दिलीप पाटील, उपसंचालक, तथा राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख