विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती
पुणे – पुणे विभागातील 13 हजार 28 करोनाबाधितांपैकी तब्बल 8 हजार 198 बाधित व्यक्ती ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण 62.93 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. तर विभागात आतापर्यंत 609 जणांचा मृत्यू झाला असून, त्याचे प्रमाण 4.7 टक्के आहे. सर्वाधिक मृत्युदर हा सोलापूर जिल्ह्यात असून त्यामुळे विभागाचा मृत्युदर काहीसा वाढलेला आहे.
विभागात सध्या 4 हजार 221 बाधितांवर उपचार सुरू असून, त्यामध्ये सर्वाधिक बाधित संख्या ही पुणे शहरात आहे. तर 277 रुग्ण गंभीर आहेत. देशात मृत्यूचे प्रमाण हे 5 टक्के आहे. तर एकट्या पुणे विभागात मृत्यूचे प्रमाण 4.7 असून, ही चिंतेची बाब आहे. पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये आज दुपारपर्यंत एकूण 366ने वाढ झाली आहे.
यामध्ये पुणे जिल्ह्यात 230, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 107, सांगली जिल्ह्यात 04 तर कोल्हापूर जिल्ह्यात 5 संख्या आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यातील बाधितांची संख्या 10 हजार 81 वर पोहोचली आहे. त्यातील 6 हजार 380 बाधितांना सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. तर 3 हजार 259 बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. आतापर्यंत एकूण 442 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात 669 करोना बाधित असून आतापर्यंत 401 जणांना घरी सोडले. तर, 28 जणांचा मृत्यू झाला. 240 बधित उपचार घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 410 बाधितांपैकी 792 बाधित बरे होऊन घरी गेले. तर, 493 जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत 125 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली 176 बाधितांपैकी 97 जण बरे झाले आहेत. तर 73 जणांवर उपचार सुरू आहेत. 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमध्ये 692 बाधितांपैकी 528 व्यक्ती बरे झाले असून, 156 जण उपचार सुरू आहेत. तर 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे.