मल्हारपेठ – अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीस पाटण पोलिसांनी गव्हाणवाडी (ता. पाटण) गावाच्या हद्दीत पकडले. त्याच्याकडून पाच गोणी गुटखा, रोख रक्कम, वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी असा एकूण ३ लाख २५ हजार ७९० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील मोरगिरी भागात गुटखा विक्रीसाठी एक गाडी येणार असल्याची माहिती उपअधीक्षक विवेक लावंड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल संग्राम संपतराव पवार, पोलिस उपनिरीक्षक श्रीमती डी. डी. पाटील तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
भरत मोहनलाल जैन (रा. शुक्रवार पेठ कराड ) मोरगिरी भागात तंबाखूजन्य सुगंधित गुटखा पान मसाला विक्रीसाठी येणार असून त्यांच्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ही व्यक्ती नवारस्ता गव्हाणवाडीमार्गे मोरगिरीकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी गव्हाणवाडी फाट्यावर सापळा लावला. बुधवारी दि.१९ जुलै रोजी रात्री ९.३५ च्या सुमारास पांढऱ्या रंगाची फियाट फेंटो गाडी (एमएच ११ एच ३७५) दिसली. ही गाडी थांबवून पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डीकीमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोणी आढळून आल्या.
या गोण्यांमध्ये गुटखा सुगंधी पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी गाडीची व गाडी चालकाची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे असणारी रोख रक्कम ४२,०७० रूपये,२,५०,००० रुपये किमतीची फियाट फंटो गाडी, १५००० रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ३ लाख २५ हजार ७९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीमती डी. डी.पाटील, पोलीस हवालदार जाधव, तारळेकर, चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, कटरे, शशेळके यांनी सहभाग घेतला.