मुंबई / नवी दिल्ली – नागालॅंडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सात आमदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. “संपूर्ण प्रदेश कार्यकरणीने आणि जिल्हाध्यक्षांनी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात नागालॅंडमध्ये पक्षाला मजबूत बनवायचे निश्चित केले आहे,’ असे नागालॅंड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे अजित पवारांची बाजू भक्कम झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांनी शरद पवार यांची साथ दिली आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड करत भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांना पंधरा दिवसांतच दिलेला हा दुसरा मोठा धक्का आहे.
नागालॅंड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडियो यांनी गुरुवारी दिल्लीत कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवित असल्याचे पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.