पुणे – बंदुकीच्या धाकाने एका दाम्पत्यास कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ लूटण्यात आले. यामध्ये दाम्पत्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि महागडे घड्याळ असा 1 लाख 20 हजाराचा ऐवज लुटण्यात आला. ही घटना रविवारी रात्री साडेबारा वाजता घडली.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींविरुद्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दाम्पत्य जेवण्यासाठी कारमधून खेड-शिवापूर येथे गेले होते. डॉ.चिन्मय विठ्ठल देशमुख (32, रा.राजश्री शाहू सोसायटी, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह कारमधून खेड-शिवापूरला जेवायला गेले होते. जेवून परतत असताना ते कात्रजचा नवीन बोगदा ओलांडल्यावर गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून लघुशंका करत होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या पत्नीच्या पोटाजवळ बंदूक लावून धमकावले. यानंतर दोघांकडील दोन तोळे सोन्याच्या दोन अंगठ्या व कॅरोस कंपनीचे मनगटी घड्याळ काढून घेतले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील करत आहेत.
खेड-शिवापूरचे जेवण पडतेय महागात
खेड-शिवापूरला मोठ्या प्रमाणात ढाबे आणि हॉटेल झाली आहेत. यातील काही ढाबे नॉन-व्हेजसाठी प्रसिध्द आहेत. पुण्यातील खवय्ये या ढाब्यांवर नॉनव्हेजचा आस्वाद घेण्यासाठी सर्रास जात असतात. मात्र रात्री परतताना लघुशंकेसाठी थांबल्यास त्यांना लूटले जाते.
तर काहींचे नवीन बोगद्याच्या पुढील उतारावरुन गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होतात. मागील तीन-चार वर्षात अशाप्रकारचे अपघात आणि लूटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळेस न नवीन बोगद्याच्या पुढे परिसर सुनसान असतो.