धुळे – नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत होत असताना दुसरीकडे शिरपूर येथील दोन युवकांवर काळाने घाला घातला आहे. शिरपूर येथील चोपडा रस्त्यालगत जात असताना चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रवीण पाटील (रा. क्रांतीनगर) व प्रशांत भदाणे (रा. मातोश्री कॉलनी, शिंगावे शिवार) असे मयत युवकांचे नाव आहे. 31 डिसेंबरच्या रात्री शिरपूर-चोपडा रस्त्यालगत असलेल्या सूतगिरणीच्या मागील परिसरातून हॅरियर कारने प्रवास करणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले.
यानंतर कार नाल्यात जाऊन कोसळली. कारचा वेग जास्त असल्याने कारमधील प्रवीण पाटील व प्रशांत भदाणे जागीच ठार झाले. अपघातानंतर रात्रभर कार व मृतदेह घटनास्थळीच पडून होते.
दोघांच्या मोबाईलवर संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पहाटे तेथून ये जा करणाऱ्या लोकांना कारच्या अपघाताबाबत माहिती मिळाली.