Imran Khan Wife Bushra Bibi : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान याना काल पाकिस्तानच्या न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांचा देशातील निवडणूक लढवण्याचा मार्ग बंद झाला आहे. असे असताना दुसरीकडे इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना देखील आज मोठा झटका बसला आहे. कारण बुशरा बीबी यांना न्यायालयाने 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
तोशाखाना प्रकरणी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) प्रमुखाच्या पत्नीवर ही कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीने याला दुजोरा दिला आहे. यासोबतच न्यायालयाने दोघांनाही 10 वर्षांसाठी कोणत्याही सार्वजनिक पदावर बहाल करण्यास मनाई केली आहे. न्यायालयाने त्यांना 78.7 कोटी रुपयांचा सामूहिक दंडही ठोठावला आहे.
इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी आज न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. दरम्यान, काल इम्रान खानला देशाची गोपनीय कागदपत्रे इतरांना दिल्याबद्दल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयाची ही शिक्षा त्यांच्यासाठी दुहेरी धक्का मानाला जात आहे.
बुशरा बीबीच्या अगोदरच्या पतीने गुन्हा दाखल केला होता
25 नोव्हेंबर 2023 रोजी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीचा माजी पती खवर फरीद मनेका यांनी दोघांवर व्यभिचार आणि फसव्या लग्नाचा आरोप केला होता. 71 वर्षीय खान आणि 49 वर्षीय बुशरा बीबी यांच्याविरुद्ध पाकिस्तान दंड संहितेच्या विविध कलमांखालील खटला इस्लामाबाद पूर्व येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश कुदरतुल्ला यांच्या न्यायालयात सुरू होता, जिथे ही शिक्षा सुनावण्यात आली.
इम्रान खानवर वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केल्याचा आरोप
खटल्याच्या सुनावणीदरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीच्या माजी पतीने सुनावणीदरम्यान आपल्या वक्तव्यात आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केला की, खान यांनी त्यांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केले आहे. खटल्यादरम्यान, इस्तिकहम-ए-पाकिस्तान पक्षाचे सदस्य अवान चौधरी, विवाह आयोजक मुफ्ती मुहम्मद सईद आणि मनेकाच्या घरातील कर्मचारी लतीफ यांना नोटीस बजावण्यात आली आणि त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले. खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्यांनी या आरोपांवर जोरदार टीका केली होती.
2017 मध्ये घटस्फोट झाला
बुशराच्या माजी पतीने सांगितले की, खान रात्री उशिरा बुशराला फोन करायचा, बुशराला संभाषणासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक आणि मोबाइल फोनही देण्यात आला होता. मनेकाने सांगितले की, त्याने 14 नोव्हेंबर 2017 रोजी बुशराला घटस्फोट दिला होता. 1 जानेवारी 2018 रोजी इम्रान खानने बुशरासोबत लग्न केले होते.