Imad Wasim Smoking Cigarette & Herschelle Gibbs Story : सध्या पाकिस्तानी क्रिकेटर इमाद वसीम चर्चेत असून ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढतानाचा त्याचा फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुलतान यांच्यातील PSL 2024 च्या अंतिम सामन्यात तो असे करताना आढळून आला. पण एक असा खेळाडू देखील आहे ज्याने दारूच्या नशेत अशी खेळी खेळली जी पुढील काळासाठी स्मरणात राहील. हर्षल गिब्सने खेळलेल्या 175 धावांच्या खेळीबद्दल आम्ही बोलत आहोत, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला होता.
हर्शल गिब्सने खेळली होती ऐतिहासिक खेळी…
ही गोष्ट आहे 2006 च्या त्या सामन्याची जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीत होते आणि पाचवा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जात होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळताना 50 षटकात 434 धावा केल्या, जी त्यावेळच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या होती. या सामन्यात रिकी पाँटिंगने 164 धावांची खेळी केली होती. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाचा खेळाडू हर्शल गिब्सने आपल्या स्फोटक फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याने 111 चेंडूत 175 धावांची तुफानी खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला लक्ष्य गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गिब्सने दारूच्या नशेत खेळली ही खेळी…
2010 मध्ये हर्शल गिब्सने त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्याने एक मोठा खुलासा केला होता की, 175 धावांची इनिंग खेळण्याच्या आदल्या रात्री तो त्याच्या मित्रासोबत पहाटे 1 वाजेपर्यंत मद्यपान करत होता आणि फलंदाजीसाठी क्रीझवर जाण्यापूर्वी देखील तेव्हा त्याची नशा पूर्णपणे उतरली नव्हती आणि मद्यधुंद अवस्थेत 21 चौकार आणि 7 षटकार मारत 175 धावांची खेळी खेळू शकणे, हे काही चमत्कारापेक्षा कमी नव्हते.
ऑस्ट्रेलियाच्या 434 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 438 धावा करून तो सामना जिंकला आणि आजही ही धावांचा पाठलाग करताना केलेली एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.